सोलापूर दि. 22 : सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सोलापुर चेस अकॅडमी व चॅम्प चेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय खुली व मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी आकर्षक खेळाचे प्रदर्शन करत विजयी सुरुवात केली.
इंडियन मॉडेल स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर शहरासह अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी व माढा आदी तालुक्यांतील १८ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह ७८ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे.मुलांच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मानस गायकवाड, श्रेयस कुदळे, आदिराज म्हेत्रे, श्रेयांश इंगळे, नियान कंदीकटला, मयुर स्वामी, देवदत्त पटवर्धन, नैतिक होटकर, युवराज गायकवाड, नागेश राजमाने, सानिध्य जमादार, कृष्णराज पटले तसेच मुलींच्या गटात बार्शीची राष्ट्रीय खेळाडू सानवी गोरे, पृथा ठोंबरे तसेच आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अनन्या उलभगत यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शानदार विजय मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन मॉडेल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आदिती कुलकर्णी यांनी राजासमोरील प्यादे दोन घर पुढे सरसावत केले. यावेळी आय.एम. एस. स्कूलचे समन्वयक सचिन ढवण, राष्ट्रीय पंच संतोष पाटील स्पर्धेत प्रमुख पंच वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत सहाय्यक पंच म्हणून प्रज्वल कोरे व पद्मजा घोडके आदी काम पाहत आहेत.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात आदिती कुलकर्णी यांनी खेळाडू व पालकांना खेळाचे महत्त्व विशद करत बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास चालना मिळते असे सांगितले. तसेच सर्व खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या दोन मुले व मुलींची निवड मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत असून उपस्थितांना अनेक प्रेक्षणीय लढती पाहण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत.
