कामती : आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचा जबाबदार नागरिक असतो. त्याला घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. आई-वडिलांपेक्षा अधिक वेळ विद्यार्थी शाळेत घालवत असल्याने शिक्षकांनी त्यांच्या बालमनावर सकारात्मक संस्कार घडवणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळाल्यास हाच विद्यार्थी भविष्यात शाळेचे व गावाचे नाव उज्वल करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल, घोडेश्वर येथील उपक्रमशील शिक्षक संतोष पाटील यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक संतोष पाटील यांच्या स्वखर्चातून स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरीचे प्रतिनिधी सुहास घोडके, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बचुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती जगताप, उपाध्यक्ष अलताफ मुलाणी, समाधान जगताप, प्रविण सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने संतोष पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय गावडे, प्रभाकर माने, वर्षा माने, संतोष अंकुश, अश्फाक शेख, सतीश राठोड यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
