सोलापूर दि. 25 : अमेरिकेतील शिक्षण पद्धती संशोधनाच्या संधी अभ्यासातील शिस्त इत्यादी सर्व बाबी भारतीय विद्यार्थ्यांनी अवगत करून घ्याव्यात. जेणेकरून भारतीय विद्यार्थी जगाच्या पटलावर कुठेही मागे राहणार नाही. भारताचे नाव निश्चितच उज्वल करतील असे विचार अमेरिकेत वैद्यकीय उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. क्रांती खंडागळे यांनी मांडले.

त्या सदसंकल्प शिक्षण समूह सोलापूर संचलित राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयात नामदेवराव (बापू) भालशंकर यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त आयोजित क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करतेवेळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यवान पाचपुडवे हे होते.
सुरुवातीला डॉ. क्रांती खंडागळे यांचा अस्मिता भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. क्रांती खंडागळे यांच्या हस्ते नाणी उडवून खो-खो सामन्याचे उद्घाटन करून सामना सुरू करण्यात आला . खेळाच्या सामन्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. क्रांती खंडागळे यांना कुतूहल पूर्वक अनेक प्रश्न विचारले.
अमेरिकेतील लोकांची, विद्यार्थ्यांची जीवनपद्धती, राहणीमान,बोलण्याची पद्धत, शैक्षणिक संस्थांमध्ये असणाऱ्या भौतिक सोयी,सुविधा विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्धत, संशोधनाच्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांमध्ये,तेथील लोकांच्यामध्ये असणारी शिस्त अशा अनेक बाबीवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.तितक्याच सहजतेने डॉ. क्रांती यांनी सर्व प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
त्यांनी खो-खोच्या सामन्यांमध्ये स्पर्धक म्हणून भागही घेतला. या क्रीडा सप्ताहाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद भालशंकर, प्रविण पाटील, रामचंद्र व्हनकडे,क्रीडा शिक्षक भोजराज गायकवाड तसेच शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
