सोलापूर दि. 12 : शहरातील लोकप्रिय युवा नेतृत्व, लोकसंग्रह आणि सामाजिक कामासाठी ओळखले जाणारे मोहसिन शेख यांनी आपल्या शेकडो कट्टर समर्थकांसह शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरातील राजकीय वातावरणात सकारात्मक उर्जा निर्माण झाली असून शिवसेनेच्या संघटनवाढीला मोठी चालना मिळाल्याचे चित्र आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, जिल्हाप्रमुख अमर अण्णा पाटील, जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, शहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
शिवसेनेचे उपरणे घालून आणि पुष्पगुच्छ देऊन मोहसिन शेख तथा त्यांच्या सहकाऱ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. प्रमुख नेत्यांची गौरवपूर्ण उपस्थितीया महत्वाच्या प्रवेश कार्यक्रमाला शिवसेना आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये विशेषतः —शिवसेना नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे,माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, माजी जिल्हाप्रमुख मनीषभाई काळजे, नगरसेवक मनोज शेजवाल आणि उमेश गायकवाड, शिवसेना नेते श्रीनिवास संगा, तसेच जिल्हा-शहर पातळीवरील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला, युवती सेना, अल्पसंख्याक विंग, तसेच विविध सामाजिक समूहांतील नेतेही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अनिता माळगे, रवीना राठोड, प्रियांका परांडे, रजाक मुजावर, एजाज शेख, गफूर दादा शेख, मोईन शेख, सलाउद्दीन शेख आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मोहसिन शेख यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
मोहसिन शेख यांचे नेतृत्व आणि कामांची दखलवर्षानुवर्षे सोलापुरात विविध सामाजिक उपक्रम, युवकांना रोजगारासाठी मार्गदर्शन, शैक्षणिक मदत, तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे मोहसिन शेख हे युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
त्यांच्या कामाची दखल घेत शिवसेनेने त्यांना मोठा मान देत पक्षात समाविष्ट केले. विकासाभिमुख राजकारण, पारदर्शकता आणि सामाजिक न्याय या भूमिकेमुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकित होत आहे.
शिवसेनेला मिळणार नवे बळमोहसिन शेख यांचा प्रवेश हा फक्त एक औपचारिक कार्यक्रम नसून, सोलापूरमधील युवा आणि अल्पसंख्याक समाजातील शिवसेनेची पकड अधिक मजबूत करणारा निर्णय ठरणार आहे. त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह झालेल्या प्रवेशामुळे सोलापुरातील शिवसेना संघटन अधिक विस्तारले आहे.
शहरातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये आणि भविष्यातील निवडणूक तयारीत मोहसिन शेख व त्यांची टीम निर्णायक भूमिका बजावतील, असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.विशेषता: मोहसीन शेख प्रभाग २० ( वीस ) मधून २०१७ सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप कडून निवडणूक रिंगणात होते त्यावेळी त्यांनी तगडी लढत देत प्रस्थापितांना घाम फोडले होते. मात्र यंदा शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविणार असे त्यांच्या समर्थकां कडून सांगण्यात येत आहे
