परभणी दि. 3 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी युवा नेते सुजात आंबेडकर यांचा परभणी जिल्ह्यात भव्य प्रचार दौरा पार पडला. 4 फेब्रुवारी पिगळी, पेडगाव, झरी आणि परभणी येथे मोठ्या उत्साहात जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रचारसभेत बोलताना युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि पारंपरिक राजकीय पक्षांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या लोकांनी वर्षानुवर्षे विकासाच्या नावाखाली निधी लुटला, अशा लोकांना सत्तेबाहेर ठेवा. वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे, प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे प्रतिनिधी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास जिल्हा परिषद शाळांची संपूर्ण पुनर्बांधणी करून दर्जेदार व आधुनिक शिक्षण व्यवस्था उभी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना हमीभाव, पीकविमा आणि नुकसानभरपाई वेळेवर मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आणि वंचित समाजघटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. सत्ता ही सेवा करण्यासाठी आहे, लुटीसाठी नाही, असे स्पष्ट मत सुजात आंबेडकर यांनी मांडले.
या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने परभणी जिल्ह्यातील निवडणूक वातावरण चांगलेच तापवले असून आगामी निवडणुकीत मोठा बदल घडवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
