सोलापूर दि. 2 : गाथा चिंतन ट्रस्ट, गाथा चिंतन मराठी साहित्य परिषद, संत तुकोबा संशोधन व प्रशिक्षण केंद्र यातर्फे आयोजित संत विचारांवरील वारकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण महात्मा गांधी स्मारक भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून ह भ प धर्मकीर्ती महाराज परभणीकर हे लाभले होते तर या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ह भ प जनार्दन महाराज मस्के यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ सुभाष बागल, सुरेश राऊत, प्रा भारत पगारे होते.
एक दिवशीय शिबिरामागची भूमिका मांडताना गाथा चिंतन ट्रस्टचे ह भ प डॉ बालाजी महाराज जाधव म्हणाले की, ” वारकरी संप्रदायांच्या विचारांचा आणि विठ्ठल भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केलेले आहे. पाखंडाचे खंडन करून वारकरी धर्म जोपासता यावा व वाढवता यावा यासाठी अशा प्रशिक्षण शिबिराचे वारंवार आयोजन केले जाईल. महाराष्ट्र मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकवायची असेल तर वारकऱ्यांचा अस्सल विचार टिकवणे अत्यंत गरजेचे आहे आणि तेच कार्य आपल्याला करायचे आहे.”
प्रशिक्षण शिबिरात ह भ प धर्मकीर्ती महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या उदयाची कारणमीमांसा केली. त्याबरोबरच वारकरी संतांचे आंदोलन संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून ते गाडगे महाराज यांच्यापर्यंतचा समग्र इतिहास ओघवत्या वाणीतून सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बोडखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शिबिरार्थीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
