सोलापूर दि. 8 : शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात अंतर्गत वाद असल्याच्या वावड्या विरोधकांकडून सातत्याने उठवल्या जात होत्या. मात्र या सर्व चर्चांना फाटा देत दोन्ही आमदारांनी एकत्र येत राजकीय ताकद दाखवून दिली. प्रभाग क्रमांक ७ मधील भाजप प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे हे एकाच स्टेजवर एकत्र दिसून आल्याने भाजपातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

दोघांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर मिळाले आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तब्बल ४९ नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळी शहर उत्तर आणि शहर दक्षिण असे दोन आमदार भाजपाकडे होते. आता त्यात शहर मध्य मतदारसंघाची भर पडल्याने भाजप अधिक मजबूत स्थितीत आहे. प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघातून २५ नगरसेवक निवडून आणण्यासाठी ताकद लावल्यास ७५ नगरसेवक सहज निवडून येऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधून यापूर्वी आमदार देवेंद्र कोठे हे नगरसेवक होते. त्यांच्या जागी आता पद्माकर उर्फ नाना काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या वेळी नाना काळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. भाजपच्या विकासकामांची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या उमेदवाराला साथ द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोठे–देशमुख यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे भाजपातील संघटनात्मक एकजूट अधोरेखित झाली असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजप अधिक दमदार कामगिरी करणार, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
