बेंगलुरू, दि. 1 : महाराष्ट्राच्या कुमार व मुलींनी 44व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची विजयी सलामी दिली.
कर्नाटका खो-खो असोसिएशनच्या वतीने बेंगलुरू शहरातील गुंजर मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत जिंतेंद्र वसावेने (4.10 मि. व 6 गुण) व राज जाधव (1.20 मि. व 6 गुण) यांच्या अष्टपैलू खेळामुळे महाराष्ट्राच्या कुमारांनी राजस्थानवर 38-8 असा एक डाव राखून 30 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. हरद्या वासावेनेही 2 मिनिटे पळती करीत संरक्षणाची बाजू सांभाळली. राजस्थानकडून नरेशने (1 मि. व 2 गुण) एकाकी लढत दिली.मुलींनीही झारखंडचा 62-8 असा धुव्वा उडविला. श्रावणी तामखेडे (3.30 मि. व 2 गुण), श्रुती चोरमारे (2.40 मि. व 6 गुण) व धनश्री कंक (2,50 मि. व 8 गुण) हे महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार ठरले. झारखंडच्या नंदिनीकुमार व चंदीराणी यांचे प्रयत्न अपुरे पडले.
विदर्भच्या कुमारांची चंदीगडवर मातराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विदर्भ व कोल्हापूरचे संघही स्वतंत्रपणे भाग घेत असतात. विदर्भच्या कुमार संघाने चंदीगडवर 33-16 अशी एक डाव राखून 17 गुणानी मात केली. विदर्भच्या सुजक खंदारेने (4 मि.व 4 गुण) अष्टपैलू खेळी केली. हर्षल मोरे (1.30, 4.20 मि.) व झैद खान (2.20) यांनी संरक्षणाची बाजू सांभाळली.
कोल्हापूरच्या दोन्ही संघाचे शानदार विजय – कोल्हापूरच्याही कुमार व मुली संघाने दणदणीत विजय मिळविले. कुमारांनी दोन शानदार विजयाची नोंद केलवी. योगेश मंचीकट्टाचा (2.45मि. व 2 गुण) अष्टपैलू खेळ आणि सिद्धेश माने (4.40 मि.) व राजेश मांगलेकरच्या (2.45मि.) शानदार संरक्षणाच्या खेळीमुळे कुमार संघाने चंदीगडला 42-4 असे एक डाव राखून 38 गुणांनी नमविले. दुसऱ्या सामन्यात गोव्यावर 44-8 अशी डावानी पराभूत केले. कोल्हापूरकडून प्रसाद शेळके (4.30 मि.), श्रावण वाडेकर (2.50 मि. व 6 गुण) व उदय पडाळकर ( 8 गुण) तर गोव्याकडून रजत वेलीप (1मि.) व क्रीश गावकर (2गुण) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.मुलींनी आंध्रप्रदेशला 50-10 असे एक डा राखून 40 गुणांनी हरविले. कोल्हापूरच्या विजयात चैत्राली अवधूत (4.20 मि.), श्रावणी पाटील (3.20 मि.व 6 गुण)व भक्ती तुरंभेकर (2.20 मि. व 3 गुण) यांच्या महत्वपूर्ण वाटा आहे.
