पुणे दि. 1 : अभिमानाचा इतिहास आणि शौर्याची गाथा सांगणाऱ्या १ जानेवारीच्या पूर्वसंध्येला पुण्याचे रस्ते निळ्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून ‘अभिवादन बाईक रॅली’ काढत शौर्य दिनाचा जयघोष केला. या रॅलीचे नेतृत्व युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केल्याने तरुणाईमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वात तरुणांचा मोठा ताफा भीमा कोरेगावच्या दिशेने निघाले आहेत.

‘चलो भीमा कोरेगाव’चा नारा देत, शौर्य दिनाचा उत्साह आणि महापुरुषांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे. रॅलीच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, निळ्या निशाणांनी परिसर दुमदुमून गेला.
“महापुरुषांचा विचार आणि भीमा कोरेगावचे शौर्य” मनात बाळगून शिस्तबद्ध पद्धतीने हा ताफा भीमा कोरेगावच्या दिशेने निघाला. देशभरातून आलेल्या अनुयायांच्या गर्दीत वंचित बहुजन आघाडीच्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महापुरुषांच्या सन्मानार्थ दिलेल्या घोषणांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला.
