सोलापूर, दि. १ : जेव्हा आपल्या पाठीशी एखादा प्रशिक्षक असतो, तेव्हा आपण कधीच हरु शकत नाही. माझे प्रशिक्षक राजू शेळके यांनी माझ्यासाठी कष्ट घेतल्यामुळे मी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ शकले, असे मत भारतीय दिव्यांग टी-२० क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा संभाजी कदम यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आठ खेळांच्या सराव शिबिराच्या सांगता समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर होते. याप्रसंगी गंगाचे प्रशिक्षक राजू शिवाजी शेळके, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत बसवराज दामा, परिक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे आदी उपस्थित होते.
महामहिम राज्यपाल कार्यालय आयोजित महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा जगतातील एक महत्त्वपूर्ण असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आठ खेळातील पुरुष व महिला असे १६ संघ सहभाग घेणार आहेत.
यावर्षी या स्पर्धेचे आयोजन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाकडून या महोत्सवासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा असा एकुण १८७ जणांचा मोठा चमू नांदेडकडे जात आहे. यात १६२ खेळाडू ( पुरुष व महिला), २४ संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक आणि १ स्पर्धा समन्वयक यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बुद्धिबळ या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
प्रशिक्षक म्हणून बहुमान स्वीकारावा
यावेळी कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, आज गंगा कदम यांनी संकटावर मात करत मोठे शौर्य गाजवले आहे. याचा समस्त सोलापूरकरांना अभिमान असून त्यामुळे सोलापूरची मान उंचावली आहे. अशक्य गोष्ट शक्य करून त्यांनी मोठे यश संपादन करून एक आदर्श निर्माण केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण द्यावे व प्रशिक्षक म्हणून विद्यापीठाचा बहुमान स्वीकारण्याची विनंती देखील कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी त्यांना केली.
क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा समन्वयक प्रा. बाळासाहेब वाघचवरे यांनी सूत्रसंचालन केले. शिवानंद मैलारी यांनी आभार मानले.
