धाराशिव दि. 25 : कवठा (ता. उमरगा) ग्रामपंचायतीच्या हद्दीत धार्मिक आणि सामाजिक कार्याचा मोठा संगम पाहायला मिळणार आहे. आमदार निधीतून मंजूर झालेल्या ‘त्रिशिव हनुमान मंदिर’ सभागृहाचा भव्य भूमीपूजन (पायाभरणी) समारंभ गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मंदिराचे बांधकामच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप आणि नवनिर्वाचित सदस्यांचा नागरी सत्कार देखील करण्यात येणार आहे.
*राजकीय व सामाजिक दिग्गजांची उपस्थिती – या कार्यक्रमाचे उद्घाटन उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रविण स्वामी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टी (लातूर जिल्हा ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
*सत्कारमूर्ती आणि मान्यवरांची मांदियाळी – या सोहळ्यात गावाच्या आणि परिसराच्या विकासात योगदान देणाऱ्या सत्कारमूर्तींचा गौरव केला जाणार आहे, शरण पाटील (सहअध्यक्ष, शेत पानंद रस्ते समिती), शहाजी पाटील (जि.प. सदस्य, धाराशिव), आकांक्षा चौगुले (सभापती, पं.स. उमरगा), रफिक तांबोळी व योगेश राठोड (जि.प. सदस्य)यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान केला जाईल.
*प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन – कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून केशव (बाबा) पाटील (माजी जि.प. उपाध्यक्ष), वसंतराव नागदे (चेअरमन, जनता बँक), सुरेश बिराजदार (चेअरमन, भाऊसाहेब बि.सा.का.समुद्राळ) आणि विनायकराव पाटील (अध्यक्ष, श्रमजीवी शिक्षण संस्था) यांची उपस्थिती लाभणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
*सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श – कवठा ग्रामस्थांनी केवळ धार्मिक कार्यावर भर न देता, गावातील भगिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तसेच, लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्याकडून भविष्यातील विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली जाणार आहे.
*आयोजक व निमंत्रक – या सोहळ्याचे नियोजन सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच विकास पाटील, चेअरमन संजय सोनवणे, सचिव बाबू सावंत, कोषाध्यक्ष डॉ. रविंद्र सोनवणे आणि समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ व युवक मंडळ, कवठा यांनी केले आहे.
