लातूर दि. 2 : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उजनी येथे वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ज्या समाजघटकांना आतापर्यंत प्रस्थापित राजकारण्यांनी सत्तेपासून वंचित ठेवले, त्यांना सत्तेत पोहोचवण्याचे ऐतिहासिक काम बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केले आहे.

धनगर, माळी, तेली, साळी, कैकाडी, घिसाडी, बौद्ध, लिंगायत, मुस्लिम आणि आदिवासी अशा सर्व समाजघटकांचे प्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर स्वतः मैदानात उतरले असून, ते ठिकठिकाणी नागरिकांचे मत जाणून घेत आहेत.

जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत, त्यांना विजयी करण्याची जबाबदारी ही केवळ पक्षाची नसून सर्व वंचित समूहांची आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या जाहीर सभेला उजनी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंचावर पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये अविनाश भोसीकर (राज्य कार्यकारिणी सदस्य), संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य व नगरसेवक गटनेता),मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष), सुजाता अजनिकर, आकाश इंगळे, ॲड. निखिल अड्डाणसिंह हे उपस्थित होते.
याव्यतिरिक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व अधिकृत उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमुळे लातूर जिल्ह्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
