पुणे दि. 29 : भारतीय इतिहासातील देदीप्यमान पर्व असलेल्या भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त, १ जानेवारी २०२६ रोजी विजय स्तंभ परिसरात ‘शौर्यदिन अभिवादन जाहीर सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे या सभेत भीम अनुयायांना मार्गदर्शक करणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक भीमा कोरेगाव येथे येत असतात. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा नेतृत्वाच्या विचारांची दिशा स्पष्ट करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता विजय स्तंभ परिसर, भीमा कोरेगाव (पेरणे फाटा) येथे भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. सुजात आंबेडकर या सभेच्या माध्यमातून सध्याची राजकीय परिस्थिती, बहुजन समाजापुढील आव्हाने आणि युवकांची भूमिका यावर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभेच्या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तसेच आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुजात आंबेडकर यांची बाईक रॅली निघणार असून, विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.
ही भव्य रॅली ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होईल. ही रॅली पुणे स्टेशन ते भीमा-कोरेगाव विजयस्तंभ या मार्गाने मार्गस्थ होणार आहे. या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून शौर्यदिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त आणि सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
