सोलापूर दि. 10 : सोलापुरातील पोलिसावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पंधरा लाख रुपयाची खंडणी स्वीकारताना तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली. पूजा ढवळे (वय 37 रा. शिवगंगा नगर) मिलिंद कांबळे ( वय 47 रा. बुधवार पेठ) लक्ष्मी लोंढे( वय 45 रा. एस आर पी एफ कॅम्प जवळ) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याविषयीच्या अधिक माहिती अशी की. जितेंद्र रामहरी भोसले (वय 42 रा. पंचरत्न निवास नेताजी नगर जोडभावी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर जोडभावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता, तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी 15 लाखाची मागणी केली. ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोन करून भेटायचे ठरले. एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलावली. त्याची तक्रार भोसले आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्ण गायकवाड यांनी दोन पंचा सोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावला. भोसले यांनी आरोपींना पन्नास हजार रुपये रोख, दीड लाखाचा व एक तेरा लाखांचा असे दोन चेक दिले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तिथे येऊन भोसले यांनी दिलेले रक्कम व दोन चेक आणि आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी या तिन्ही आरोपींवर बीएनएस 308, ३५१ ,३(५ )अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
