सोलापूर दि. 14 : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान गौरव परीक्षा सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. सोलापूर शहरातील लोकराजा अभ्यासिका, विश्वभूषण विद्यालय तसेच माढा तालुक्यातील मातोश्री माध्यमिक विद्यालय, म्हैसगाव या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
ही परीक्षा इयत्ता ८ वी ते १२ वी आणि १२ वी पुढील (पदवी, पदव्युत्तर) अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. संविधानाविषयी जनजागृती करणे व समाजात संवैधानिक मूल्ये रुजवणे हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यामागे “संविधान समजणारी, संविधान जपणारी पिढी घडवणे” हा स्पष्ट हेतू असल्याचे राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी सांगितले.
या परीक्षेचे महत्त्व केवळ ज्ञानवृद्धीपुरते मर्यादित नसून, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही ते अत्यंत मोलाचे आहे. भारतीय संविधान हा लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांचा महत्त्वाचा विषय असल्याने, या परीक्षेची पातळीही लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ठेवण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याची संधी मिळते. गेल्या पाच वर्षांत अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेचा प्रत्यक्ष लाभ झाला असून, त्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त झाले आहे.
यावर्षी परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण १५ हजार रुपयांची रोख शिष्यवृत्ती, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते शनिवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी शिवस्मारक सभागृह, सोलापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.संविधान केवळ कायद्याचे पुस्तक न राहता ते जीवनातील मूल्य बनावे, नागरिकांचे हक्क व कर्तव्यांची जाणीव लहान वयातच व्हावी, या उद्देशाने राबविण्यात येणारी संविधान गौरव परीक्षा ही समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे. संविधानाची जाणीव असलेली, लोकशाही मूल्ये जपणारी आणि देशसेवेसाठी सज्ज अशी नवी पिढी घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच मोलाचा आहे.
परीक्षेच्या यशस्वीतेसाठी आशुतोष तोंडसे, मुक्ता आतकरे, विनोद वर, सत्यवान पाचकुडवे, ज्योती चव्हाण, भौरम्मा वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
