सोलापूर दि. 2 : सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे आयोजित सोलापूर इंडस्ट्रीज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सामने उत्साहात पार पडले. ‘ब’ गटातील स्मृती रायझिंग स्टार्स, बालाजी ब्लास्टर्स, फायर ब्रिगेड व जी.आर.पी. लिमिटेड या संघांमध्ये चुरशीचे सामने खेळविण्यात आले.या सामन्यांमध्ये फायर ब्रिगेड संघाने तिन्ही सामने जिंकत ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर बालाजी ब्लास्टर्स संघाने दोन सामने जिंकून ४ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
स्मृती रायझिंग स्टार्स संघाने १ सामना जिंकून २ गुण मिळवले, तर जी.आर.पी. लिमिटेड संघाला गुणांचे खाते उघडता आले नाही.आजच्या सहा सामन्यांचे सामनावीर अनुक्रमे अक्षय परीट, मनीष सावंत, विश्वनाथ म्हंता, मनीष सावंत, संजय वाघमोडे व दिनेश मगर हे ठरले.
यावेळी एमआयडीसी सोलापूर कार्यालयाचे उपअभियंता प्रदीप खंदारे उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच त्यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून क्रिकेटप्रेमी सामन्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत.
