सोलापूर दि. 24 : सोलापूरात महापौर पदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले असून, मराठा समाजाला महापौरपदाची संधी द्यावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी हे पद खुले असतानाही भाजपकडून ओबीसी समाजातील व्यक्तीची निवड करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

1993 नंतर तब्बल 32 वर्षांत सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर म्हणून संधी मिळालेली नाही, असा दावा करत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करून आंदोलनकर्त्यांनी भाजपचा जाहीर निषेध नोंदवला.
आंदोलनकर्त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री तसेच भाजप नेतृत्वावर थेट टीका करत, “मराठा समाजाला सातत्याने डावलले जात आहे. सर्वसाधारण जागा असताना मराठा समाजाला संधी देणे अपेक्षित होते,” असा आरोप केला.
मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की, “भाजपने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”दरम्यान, भाजपकडून अद्याप या आंदोलनावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून, आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापुरातील या घडामोडींमुळे महापौर निवडीचा प्रश्न केवळ राजकीय न राहता सामाजिक समतोल आणि प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यांवरही चर्चेचा विषय ठरला आहे.
