सोलापूर दि. 21 : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मराठा आंदोलक राम जाधव (राज्यसमन्वयक, मराठा क्रांती मोर्चा) यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्देशून आहे.

“महापौरपदापासून ३२ वर्षे वंचित” राम जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे की, १९९३ नंतर तब्बल ३२ वर्षांपासून मराठा समाजाला सोलापूर महापौरपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.विविध कालखंडात पद्मसाली, मुस्लिम, लिंगायत, लमाण, ब्राह्मण, कैकाडी आणि धनगर समाजातील प्रतिनिधींना महापौरपदाची संधी मिळाली; मात्र मराठा समाजाला संधी देण्यात आलेली नाही,असा आरोप त्यांनी केला.

“जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपकडून संधी हुकल्याचा आरोप यंदा तीन दशकांनंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची संधी भाजपकडे असताना, शहरातील काही प्रमुख नेत्यांमुळे ती संधी गमावली गेली, असा आरोप जाधव यांनी पत्रातून केला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचा संदर्भ देत, ६८ पैकी ३० जागांवर भाजपविरोधी उमेदवार निवडून आल्याचे त्यांनी नमूद केले असून, “हीच त्या मराठा द्वेषींना जनतेने दिलेली प्रतिक्रिया आहे,” असे ते म्हणाले.
फडणवीसांच्या निर्णयांचे कौतुकही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे तसेच २०२५ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मराठा समाजाने पहिला सत्कार केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
“आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नाही; प्रत्येक समाज हा आमचा लहान भाऊ आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.पुढील आंदोलनाचा इशाराशैक्षणिक, राजकीय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजावर अन्याय झाल्यास कोणत्याही पक्षाविरुद्ध आवाज उठवला जाईल, असा इशारा देत मराठा समाज हा अन्याय कधीही विसरणार नसल्याचे जाधव यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
सोलापूरच्या राजकारणात या रक्ताने लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली असून, आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
