सोलापूर, दि. 11 : पंढरपूर तालुक्यातील शेवतेचे आदर्श क्लब व वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबने अनुक्रमे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
वीट (ता. करमाळा) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबने न्यू सोलापूर क्लबचा 14-6 असा एक डाव राखून 8 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. मध्यंतरासच त्यांनी 14-3 अशी निर्णायक आघाडी घेतली होती.
किशोर गटात शेवतेच्या आदर्श क्लबने डोणजच्या (ता.मंगळवेढा) ए. एम. स्पोर्टस् क्लबला 17-11 असे 6 गुणांनी हरविले. मध्यंतराची 8-5 अशी तीन गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली.
तृतीय स्थानासाठी झालेल्या लघुत्तम आक्रमणाच्या सामन्यात किशोरी गटात अजनाळेने येथील समृद्धी स्पोर्टस् क्लबचा 4 सेकंदानी मात केली.
किशोर गटात खंडोबाची वाडी संघाने दिनबंधू मंद्रूपवर 3 सेकदांनी नमविले. सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय वीट (ता. करमाळा) व न्यू सोलापूर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजिली होती.
स्पर्धेचे उद्घाटन श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय विटच्या संस्थेचे सचिव देविदास ढेरे यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक कोळेकर व पर्यवेक्षक श्री बर्डे, माजी क्रीडा शिक्षक एस एस ओहोळ, संस्थेचे सदस्य राष्ट्रीय खो खो खेळाडू डॉ. राजेश बर्डे, वीटचे सरपंच महेश गणगे, उपसरपंच हेमंत आवटे, जि. प.चे मुख्याध्यापक घाडगे, केंद्रप्रमुख चंद्रकांत चोरमले, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, पंच मंडळ सचिव गोकूळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड, सदस्य सुरेश खुर्द भोसले, गुलाम मुजावर, पुंडलिक कलखांबकर, आनंद जगताप आदी उपस्थित होते.
