सोलापूर दि. 24 : मोहोळ शहरातील एस.टी. स्टँडजवळ छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला असून, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ येथील एस.टी. स्टँडसमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारित येणाऱ्या राखीव जागेत २२ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. मात्र, हा पुतळा उभारण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या राखीव जागेत कोणतेही बांधकाम किंवा स्मारक उभारण्यासाठी संबंधित यंत्रणांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. तथापि, ही परवानगी न घेता सदर पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
