सोलापूर दि. 21 : जीएच रायसोनी यांच्या स्मरणार्थ आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट उद्योग समूहाचे मालक सतीश मुरुडकर व इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक सचिव अमोल जोशी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. या स्पर्धेस देशभरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन अँड कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी चॅम्प चेस स्कूलच्या सहकार्याने पहिल्या जीएच रायसोनी जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, पोंडिचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार आदी राज्यातील ९६ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह एकूण २९२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
सोलापुर येथील राजस्व मधील चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट हॉल मध्ये भारतातील नामवंत व मातब्बर खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेत आकर्षक लढती सोलापूरकरांना पहावयास मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजित पॉल, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, जर्मनीचा विजय विश्रुत, श्रीराज भोसले, ऋषिकेश कबनुरकर, इंद्रजीत महिंद्रकर, मानस गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयी सलामी दिली. तसेच पाच वर्षीय पुण्याचा अनिरुद्ध नगरकर, सांगलीचे ६८ वर्षीय जेष्ठ खेळाडू दिलीप कुलकर्णी व सोलापूरचा बिगरमानांकित खेळाडू प्रथमेश रेवतगाव, नांदेडचा नऊ वर्षीय शौर्य मुप्पणी यांनी आकर्षक खेळ करत लक्ष वेधून घेतले.
यावेळी कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव भूषण श्रीवास, सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव सतीश ठाकुर, व्यवस्थापकीय समिती समितीचे अतुल कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, फिडे मार्गदर्शक शशिकांत मक्तेदार, राष्ट्रीय पंच संतोष पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात अमोल जोशी यांनी बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष व महिला गटात भारताचे वर्चस्व असल्याचे सांगून सोलापूरचे खेळाडू देखील राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगीरी करत असल्याचे नमूद केले. तसेच सतीश बुरुडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीयस्तरावरच्या स्पर्धा सोलापुरात होत असल्याचे पाहून संघटनेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले व बुद्धिबळ खेळाच्या प्रसार व प्रचार याकरिता सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी तर प्रास्ताविक संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड यांनी केले.
स्पर्धेत प्रमुख पंच पवन राठी यांच्यासह वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, फिडे पंच अमितकुमार टेंभुर्ने, वरिष्ठ राष्ट्रीय पंच, रोहिणी तुम्मा, सहायक पंच गणेश मस्कले, विजय पंगुडवाले. भरत वडीशेरला, यश इंगळे, सुधीर वाघमारे हे काम पाहत आहेत.
