सोलापूर दि. 19 : क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार तसेच शालेय खेळ महासंघ, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६९ व्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील सान्वी दत्तात्रय गोरे हिने घवघवीत यश संपादन केले. ही राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच रांची (झारखंड) येथे पार पडली.
इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सान्वी गोरे हिने १४ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्टरित्या खेळत पाचपैकी साडेचार गुण मिळवून वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्यासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच पाच सदस्यीय महाराष्ट्र राज्य संघाला द्वितीय क्रमांक मिळवून देण्यातही तिचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला.
या उल्लेखनीय यशामुळे सोलापूर जिल्हा व बार्शी शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून हे यश संपूर्ण जिल्हा व राज्यासाठी अभिमानास्पद आहे. सान्वीच्या यशामागे तिच्या पालकांचे मोलाचे योगदान असून त्यांनी तिला अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. मोबाईलच्या युगात संयम राखून अभ्यास व क्रीडा क्षेत्रात यश मिळवता येते, हे सान्वीने सिद्ध करून दाखवले असून ती आज शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरली आहे.
झारखंड राज्याचे विशेष सचिव (जलजीवन मिशन) तथा बार्शीचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप आणि रूपाली घोलप यांनी चमकदार कामगिरी करत यश मिळविलेल्या सानवीचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या.
सध्या सान्वी गोरे हिला आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुमुख गायकवाड (सोलापूर) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेसाठी अतुल नलगे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडली. तर क्रीडा शिक्षक पुष्कराज पाटील, योगेश उपळकर व विकास पाटील, उदय वगरे, नितीन अग्रवाल यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सान्वी गोरे हिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव साहेब, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे ,संस्थेचे सचिव पी.टी.पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे (बापू), शाळा समितीच्या सदस्य मिराताई यादव मॅडम व शाळा समिती सदस्य एस.बी. शेळवणे(बापू), सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य ,सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, पर्यवेक्षक k जी. मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
