सोलापूर दि.14 : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अक्कलकोटचे आमदार दि. सिद्धारामप्पा पाटील यांचे चिरंजीव सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पाटील आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उमेश पाटील, बळीराम साठे हे उपस्थित होते.

यावेळी सिद्धाराम बाके, फिरोजी शिंगाडे, भीमराव देवकते, राजकुमार वाघमारे, सिद्धाराम अर्जुन, नागनाथ बाके यांनी पाटील कुटुंबीयांसह जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी सर्व मान्यवरांचे पक्षात सहर्ष स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभव, कार्यक्षम नेतृत्व आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याच्या जोरावर सहकार, शेती व विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळाली असून तळागाळापर्यंत पोहोचणारी ताकद अधिक भक्कम झाली आहे.
या नेतृत्वामुळे पक्षाला केवळ नवे बळ आणि ऊर्जा मिळालेली नसून, सामान्य जनता, शेतकरी व सहकार क्षेत्रातील विश्वास अधिक दृढ होत व्यापक जनसमर्थन प्राप्त होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे उमेश पाटील म्हणाले.
