सोलापूर दि.20 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांचा प्रचंड ओघ पाहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी एकट्या दिवशी तब्बल १७५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गेल्या तीन दिवसांत एकूण रेकॉर्डब्रेक ४१२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने सोलापूर शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे.

अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एमआयएम पक्षातील अनेक माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी आपल्या पक्षांना मोठा धक्का देत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनपा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख इच्छुकांमध्ये ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री, माजी स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, माजी नगरसेवक रियाज खैरदी, माजी परिवहन सभापती राजन जाधव, माजी नगरसेविका लता फुटाणे, माजी नगरसेवक विवेक खरटमल, मृणाल पाटील, गणेश पुजारी, वाहेदाबी शेख, वाहिद नदाफ, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम तसेच राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचे बंधू हरीष बागवान यांच्यासह शेकडो इच्छुकांचा समावेश आहे.
यावेळी धनंजय मुंडे समर्थक पैलवान सनी देवकते यांनी ट्रॅक्टर चालवत व धनगरी पारंपरिक पोशाखात राष्ट्रवादी भवनात येऊन अर्ज दाखल केला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रवेशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोलापूर महानगरपालिकेसाठी गेल्या तीन दिवसांपासून जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, मकबूल मोहोळकर, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, प्रा. श्रीनिवास कोंडी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, आनंद मुस्तारे, सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे आदी उपस्थित होते.
इच्छुकांचा प्रतिसाद :
शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४१२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पक्षातील आत्मविश्वास दुणावला आहे. अजितदादा पवार यांचे विकासाभिमुख धोरण, स्पष्ट व्हिजन आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत “अब की बार ७५ पार” हे लक्ष्य साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य न्याय देता येईल, अशी भावना पक्षात आहे.
